Powered by Blogger.

Wednesday, 23 May 2012

प्रेमात पडलेल्यांची लक्षणं….

बरेचदा असं होतं, की  लोकं प्रेमात पडलेले असतात, पण त्यांचं त्यांनाच समजत नाही की आपण खरंच प्रेमात पडलोय म्हणुन.  तर अशा लोकांसाठी त्यांना समजावं की आपण प्रेमात पडलो आहोत म्हणुन मुद्दाम हे पोस्ट टाकतोय. प्रेमात पडलेल्यांची लक्षणं. तुम्ही स्वतःला या मधली किती लक्षणं लागु होतात ते पहा, आणि या प्रेम रोगावर ’योग्य’ रिपिट ’योग्य’ ते उपचार करुन घ्या..
१) जिच्यावर प्रेम आहे तिच्या व्यतिरिक्त  जगातिल  प्रत्येकच मुलगी दिसायला ’तिच्यपेक्षा डावी’ दिसु लागते. मग यामधे  ऐश्वर्या रायचा फोटो जरी समोर ठेवला, तर ऐश्वर्याचं पण नाक वाकडं दिसु लागतं..
२) प्रत्येकच वस्तु मधे तिचा चेहेरा दिसु लागतो.  जिथे पहावं तिथे ती आहे असा भास होतो.
३) फोनची रिंग वाजली की  तुम्ही फोन कडे धावता, तिचाच फोन आला असावा असं वाट्तं रहातं सारख.
४) एकदा तिच्याशी फोन वर बोलणं सुरु झालं की ते कधी संपुच नये असं वाटतं. फोन ठेवतांना तिने फोन बंद केल्याशिवाय तुम्ही हॅंग करित नाही.
५) तिच्या प्रत्येक ’मिसकॉल’ची आतुरतेने तुम्ही वाट पहात असता. आणि मिसकॉल मिस होण्यापुर्वीच कॉल बॅक करता. आपल्या प्रिपेड कार्डच्या बॅलन्स ची केअर न करता…
६) मित्रांशी तुम्ही खोटं बोलणं सुरु करता.
७) स्टॅग पार्टीला जाउन मित्रांबरोबर मस्ती करण्यापेक्षा   तिच्या बरोबर पेटीकोट,भाजी, ओढणी सारख्या  फालतु गोष्टी शॉपिंगला जाणं तुम्हाला जास्त महत्वाचं वाटू लागतं.
८) तिच्या बरोबर अगदी रडूबाई सिनेमा पण तुम्ही आवडिने पहाण्यास तयार असता. प्रसंगी न कळणाऱ्या भाषेतिल चित्रपट जसे शंकराभरणम वगैरे पण तुम्ही ’आवडीने’ पहाता .
९)जगातली सगळ्यात सुंदर मुलगी म्हणजे ’ती’च हे अगदी पक्कं बसतं मनामधे.. आणि ते मत म्हणजे  काळ्या दगडावरची रेघ असते.
१०) आईने / वडिलांनी हाक मारली तरी पण ऐकु येत नाही
११) सिध्दीविनायकाच्या ट्रिप्स वाढल्या असतात.
१२) क्लास मधे शिकवत असतांना लेक्चरर पेक्षा तिच्या कडे जास्त लक्ष जातं.
१३) कोरा कागद, आणि पेन सापडला, की त्यावर आपोआप तिचंच नाव लिहिलं जातं
१४) दुकानात नविन पेन विकत घ्यायला गेलात, तरी पण लिहुन पहातांना स्वतःच्या नावा ऐवजी तिचंच नांव लिहुन पेन चेक करता.
१५)बॉस ला फोन करायला म्हणुन रिसिव्हर उचलता, आणि तिचा नंबर डायल करता.
१६)कुठेही वर्तुळाकार वस्तु दिसली की त्या मधे तिचाच चेहेरा दिसणं सुरु होतं.
१७)शिर्डीच्या साईबाबाचा दोरा हाताला बांधला असतो. प्रत्येक मंदिरासमोर येता जाता हात जोडुन उभे राहिल्याशिवाय बरं वाटत नाही.
१८)ऑफिसचा रस्ता तिच्या घरासमोरुन जातो. आता ऑफिस पश्चिमेला आणि तिचं घर पुर्वेला असलं तरीही..
१९)तिच्या भावाशी मैत्री करण्यासाठी तुम्ही काहिही करण्यास तयार असता.
२०) तिचे मित्र मैत्रीणी आपले पण मित्र व्हावेत म्हणुन तुम्ही पदरचे पैसे खर्च करायला पण तयार होता. केवळ तिचा सहवास लाभावा म्हणुन..
२१)तिला आवडतं म्हणुन तुम्ही अगदी चाटवाल्या भैय्याच्या गाडिवर -(ज्याला तुम्ही नेहेमी शिव्या घालता, घाणेरडा म्हणुन )तिच्या सोबत उभे राहुन चाट आवडिने खाता..
२२) तिचे वडिल दिसले की तुम्ही अगदी शालिनपणाचा मुखवटा पांघरुन ( कारण तुम्ही शालिन नाही हे मला माहिती आहे ) त्यांना गुड मॉर्निंग , गुड इव्हिनिंग, किंवा हॅव अ नाइस डे अंकल करता तेंव्हा.. नक्कीच!!
२३)तिच्या भावाला बुलेटवर बसुन येतांना तुम्हाला साक्षात यमराज रेड्यावर बसुन आल्याचा भास होतो.
२४)तुम्ही बुक एक्झीबिशन मधे मुद्दाम जाता आणि शेर ओ शायरी, किंवा गझल्स ची पुस्तकं  विकत आणता.
२५) रॅप, किंवा डीस्को ऐवजी तुम्हाला गझल ऐकत रहाणं आवडतं . तलत मेहमुद एकदम फेवरेट सिंगर बनतो. या जगात फक्त तलत चा आवाज शाश्वत आहे बस्स.. बाकी सब कुछ झुट है! असं वाटु लागतं.
२६)तिला आवडतो ,म्हणुन तुम्ही गुलाबी किंवा पर्पल कलर चा शर्ट विकत घेता आणि आवडिने घालता..
२७)एकटे बसले असला की दिवा स्वप्न पहाणं सुरु करता.त्या स्वप्नात केवळ तुम्ही आणि ती.. बस इतर कोणिच नसतं. लोकांना ब्लॅक ऍंड व्हाईट स्वप्न पडतात, तर तुम्हाला कलर!!
२८)झोपेचं पार खोबरं होतं. रात्री तासन तास तुम्ही तळमळत काढता तिच्या आठवणीत..
२९)तुमचे ऑफिस जरी १० वाजता असले, तरी तिच्या वेळेवर म्हणजे सकाळी ८ वाजता तुम्ही घरुन निघता, आणि तिच्याच बसने प्रवास करता.
३०) सिनेमाची हिरोइन पण तिच्या सारखीच दिसायला लागते, आणि हिरो तुमच्या सारखा.
३१)तिच्या नावाच्या स्पेलिंगचं प्रत्येक अक्षर सेक्सी दिसु लागतं.
३२) तिच्या कडे पाहिलं की ताजमहाल पाहिल्याचं समाधान मिळतं.
३३)तिच्या नावातले, आणि तुमच्या नावातले कॉमन अक्षरं तुम्ही शोधुन त्यांची न्युमरॉलॉजी ने व्हॅल्यु काढता..
३४) तुम्ही मेसेंजर वर नेहेमी अदृष्य रहाता, ती आल्यावर इतर मित्रांनी त्रास देउ नये म्हणुन..  आणि तुम्हाला फक्त तिच्याशीच चॅट करायला आवडतं . चॅटींग कमित कमी दोन तास.. एका बैठकीत..
३५)मित्रांनी बोलावलं, तर टाळुन तिच्या घरासमोर जाउन टाइम पास करणं तुम्हाला जास्त आवडतं.
३६) तिच्या कॉलेज समोरचा कॅंटीनवाला तुम्हाला उधार द्यायला पण तयार होईल इतके वेळा तुम्ही तिथे जाउन बसता.
३७)कपड्यांच्या बाबतीत तुम्ही खुप सेंटीमेंटल होता. आणि नेहेमी अगदी अप टु डेट रहाता.. काय सांगावं ती कधी भेटेल ते??
३८)जगातली सगळ्यात सुंदर भाषा म्हणजे उर्दू ( जरी येत नसली तरीही) वाटू लागते. मराठी एकदम डाउन मार्केट.
३९)अरुण दाते एकदम फेवरेट सिंगर होतो. मग दिवस तुझे हे फुलायचे ऐकलं, की तिचा चेहेरा डोळ्यापुढे येतो.
४०) नॅटकिंग कोल चे लव्हसॉंग्ज पण खुप आवडायला लागतात..
४१)गुलाम अलीचा मधाळ आवाज हदयाला घरं पाडतो, आणि शक्य होईल तेंव्हा तुम्ही ऐकत असता ही गाणी. बरेचदा बडे गुलाम अली खां पण ऐकायचा प्रयत्न करता तुम्ही.
४२)भुक वगैरे काही लागत नाही, उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म या उक्ती प्रमाणे जे काही पानात पडेल ते तुम्ही न कुरकुरता खाता. अगदी शेपुची भाजी सुद्धा.आणि जर आईने आश्चर्याने पाहिलं तर शेपु कसा तब्येतिला चांगला, यावर पण बोलता..
४३) भांग व्यवस्थित मनासारखा जमल्याशिवाय आणि कपड्यांना कडक इस्त्री असल्याशिवाय  घराबाहेर पाउल पडत नाही , ( काय सांगावं ती कधी भेटली तर कुठे??).
४४)ऑर्कुट स्क्रॅप या कम्युनिटीला जॉइन करुन रोज तिला नविन कुठला स्क्रॅप पाठवायचा याची काळजी करित बसता.
४५) तिच्या फ्रेंड लिस्ट मधे एखादा ’नको असलेला’ तर ऍड होत नाही, याची खात्री करुन घेण्यासाठी तिच्या फ्रेंड्स्च्या प्रोफाइलला रेग्युलरली मॉनिटर करता.
४६)लव्ह, प्रेम, प्यार शब्द असलेले एस एम एस शोधुन तिला पाठवता..
४७) तिला गुड मॉर्निंग म्हंटल्या शिवाय तुमचा दिवस सुरु होत नाही, आणि गुड नाईट म्हंटल्याशिवाय रात्र!!
४८)तिच्याशिवाय हे जीवन व्यर्थ आहे असे वाटु लागते.
४९)तिला पहायला कोणी आलं की तुमचा जीव कासाविस होतो, आणि तुमच्या मंदिराच्या फेऱ्या सुरु होतात.
५०)तुमचे संध्याकाळी पाच वाजता भेटायचे ठरले असतांना, तुम्ही मात्र चक्क एक तास भर आधी तिथे जाउन तिची वाट पहाता.. अजिबात कुरकुर न करता.वाट बघतांना एक एक सेकंद तुम्हाला एक एक युगा प्रमाणे वाटतो , आणि दर दोन मिनिटांनी तुम्ही घड्याळाकडे पहाता..
५१)समोर कागद – पेन असेल तर तुम्ही  सौ. तिचं नाव+ तुमचं नाव+ तुमचं आडनाव लिहुन पहाता,आणि खुळ्यासारखे स्वतःशीच हसता.
५२)?????
अजुन बरेच काही असतिल पण इथे थांबतो आता. पुढची लक्षणं तुम्ही स्वतःचा लिहा खाली कॉमेंट्स मधे..
( आणि हो.. प्रेमात न पडलेल्यांची लक्षणं लवकरच.. पुढल्या शनिवारी पोस्ट करणार  आहे.. )

0 comments:

Post a Comment