Powered by Blogger.

Sunday, 13 May 2012

मटाबाबा डॉट कॉम

ऑफिसमधे लंच टाइम मधे मटा उघडून बसलो होतो. तेवढ्यात एक मित्र आला, आणि कॉंप्युटरमधे डोकावून म्हणाला, काय रे मटा बाबा डॉट कॉम वाचतोस काय? आणि  मला हसू आवरणं शक्य झालं नाही. हे मटाबाबा  ऐकल्यावर.   देशीबाबा  च्या रांगेत नेऊन बसवलं होतं त्याने मटाला.
आजकाल ह्या वर्तमान पत्रांची पातळी इतकी    खालावली आहे की सगळ्यांसमोर हा पेपर नेट वर उघडून वाचणे पण कठीण झाले आहे . एके काळी गोविंदराव तळवलकर,  कुसुमाग्रज, दुर्गा भागवत, पुलं देशपांडे सारख्या  मातब्बर लेखकांच्या लेखांनी नटलेला दर्जेदार पेपर   होता मटा. आज त्याची जी विपन्नावस्था झालेली आहे , ती बघून वाईट वाटते.  पेपरची अशी दुर्दशा होण्याचे कारण काय ते काही समजत नाही. चांगले लेखक नाहीत?  की अजून  दुसरं काही??
टीआरपी साठी ज्या प्रमाणे इंडिया टीव्हीवर बातम्या दाखवल्या जातात , त्याच प्रमाणे पेपर मधे पण टीआरपी साठी काय वाटेल ते छापण्याची पद्धत सुरु झाली  आहे.  यलो जर्नॅलिझम म्हंटलं तरी  हरकत नाही याला.  सेक्स, नग्न स्त्रिया, असं काहीतरी छापलं  की लोकं धावत येतात पहायला. पेज हिट्स वाढले की झाले. चांगलं लिहून  पेज हिट्स  वाढवण्यापेक्षा हे  सोपं अहे.बस्स!!
ऑन लाइन पेपर उघडल्यावर पेपर वाचता वाचता   पेपरवर असलेल्या बऱ्याच लिंक्स पैकी एखाद्या लिंक वर क्लिक केल्यावर  जर डोळ्यासमोर एकदम नग्न स्त्री चा फोटो आला, आणि तेवढ्यात शेजारी कोणी आलं   तर तुम्ही काय कराल?   एकदा मी लंच टाइम मधे  मटा वाचत होतो, बहुतेक कुठेतरी क्लिक झाले असावे, आणि समोर एकदम एक स्त्रीचा अर्धनग्न फोटो आला. शेजारच्या क्युबिकल मधल्याने पाहिले तर नाही? म्हणून एकदम मागे वळून पाहिले. कसं तरी करून पेपर चे ते पेज बंद केले. तो पेपर होता अर्थात मटाबाबा.  तो फोटो जेंव्हा एकदम समोर आला तेंव्हा   बसलेल्या  धक्क्यातून  मी लवकर सावरू शकलो  नाही.
एखाद्या विवाहित   स्त्रीने योनी शुचिता सांभाळावी अशी अपेक्षा असते. वेश्ये मधे आणि घरंदाज स्त्री मधे फक्त तेवढाच फरक असतो.  त्याच प्रमाणे पेपरने पण एक स्टॅंडर्ड मेंटेन करावं अशी अपेक्षा असते.  काय छापावे काय छापू नये यावर स्वतःचे स्वतःच नियंत्रण ठेवायला हवे .  नाहीतर मस्तरामच्या पुस्तका मधे आणि पेपर मधे काय फरक शिल्लक राहील? पेपरवर हल्ली सेन्सॉरशिप नाही.  पण आजकाल पेपर वाल्यांनी  जर  सामाजिक बांधिलकीची जाणीव सोडून, कंबरेचे गुंडाळून डोक्याला बांधलेले  पाहिले  की मग मात्र सेन्सॉरशिपची खरंच  आवश्यकता आहे असे वाटायला लागते.
महाराष्ट्र टाइम्स  बद्दल  एकेकाळी एकप्रकारचा आदर होता. मी लहान असतांना नागपूरला मटा दुसऱ्या दिवशी मिळायचा, तरीही  आमच्या घरी घेतला जायचा कारण उच्च दर्जाचे लेख. उशीरा मिळाले तरी पण वडिलांना खूप आवडायचा. तसं म्हटलं तर मटाचं आणि माझं वय एकच! अगदी लहानपणापासून हा पेपर मी बघत आलो आहे. अगदी लहान असतांना पासून आयफल टॉवर वाचायला आवडायचे.   एकेकाळच्या इतक्या चांगल्या पेपरची सध्या  जी दयनीय   अवस्था झालेली आहे ती पाहून वाईट वाटतं.   वाचक मिळावे म्हणून चांगले वैचारिक लेख लिहण्यापेक्षा चक्क    पोर्नोग्राफी   आधार घ्यावा लागतो या पेपरला, ही कल्पनाच सहन होत नाही.
पेपर हा घरातल्या सगळ्यांनी वाचायचा असतो.  घरच्या कॉम्प्युटर वर मराठी पेपर वाचणारी   मुलं आहेत. मटा ची ऑन लाइन एडीशन म्हणजे एखाद्या पोर्नोग्राफी साईटला लाजवेल अशी आहे. काय छापावं- आणि काय नाही ,नग्नता किती प्रमाणात दाखवावी,याचा विधिनिषेध न बाळगता, चीप, व्हल्गर, आणि सेक्स ने परिपूर्ण असलेले काही फोटो तरी  पेज हिट्स वाढवायला छापायचे – असे प्रकार मटा ने सुरु केलेले आहेत.
२१ तारखेच्या मटा मधे सिलेब्रेशनच्या   नावाखाली जे काही फोटो मटा ने दिलेले आहेत ते सगळ्यांसमोर पहाण्याच्या लायकीचे नाहीत.   फोटोमधे काय दाखवले आहे हे सुद्धा इथे लिहीण्याची मला लाज वाटते, त्या साठी ही लिंक पहा असे फोटो छापण्यासाठी निर्लज्ज पणा  लागतो . इतका निर्लज्ज पणा अंगी मुरवायला पण खरंच गेंड्याची कातडी लागते,  वर सिलेब्रे्शन मधे दिलेल्या फोटो मुळेच हा लेख  लिहायला घेतला.   माझ्या तर्फे नो कॉमेंट्स!!
एका लेडी कॉन्स्टेबलच्या पार्श्वभागाचे छायाचित्र या पेपरने वेब मसाला मधे छापले होते.
बरं हे झालं ते  फोटो बद्दल. मटा वरचे लेख आजकाल कसे असतात हे सांगायची गरज नाही. अशुद्ध भाषा, जागोजागी इंग्रजी शब्दांचा केलेला विनाकारण वापर, वगैरे वगैरे.. शुद्धलेखन कशाला म्हणतात हे बहुतेक विसरले असावे मटा वाले. मुद्रितशोधन पण केले जाते की नाही याची  पण मला शंकाच आहे .
भाषा इतकी  अशुद्ध / चुकीची वापरलेली असते, की वाचतांना भातामधे खडे लागावे तसे ते   शब्द  वाचून अडखळायला होतं .  थोडी फार चूक एखाद्या ब्लॉगरची झाली तर समजल्या जाऊ  शकते, पण चक्क राष्ट्रीय दर्जाच्या  पेपर मधे पण चुका अजिबात क्षम्य नाहीत.
चांगले लेख न लिहिणे, चांगली भाषा “ न वापरणे “ , सेक्सी चित्र देणं, झणझणीत वेब मसाला   म्हणून पोर्नोग्राफी च्याही थोबाडीत मारेल असे फोटो लेख, फोटो छापणं, हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, आणि आम्ही असेच  करणार,  हे  यांचे ( मटाचे) ब्रिद  आहे की काय असा संशय येतोय हल्ली.
आमची निवड मधे( लिंक इथे आहे) हे लोकं अक्षरशः सिंगल/डबल एक्स रेटींगचे फोटो देतात. आणि वर शीर्षक काय तर म्हणे “आमची निवड’- वाह! क्या बात है.कपाळावर हात मारून घ्यावासा वाटतो. पेपर हा   १३ वर्षाचा मुलगा ते ८० वर्षाचे आजोबा कोणीही वाचतो-.  त्या मुळे जे काही असेल ते सगळ्यांना पहाता येण्यासारखे,  वाचता येण्यासारखे  असावे असे वाटते. ज्याला पोर्नोग्राफी पहायची आहे त्यांच्यासाठी अनेक साईट्स आहेत नेट वर.
काही दिवसा पूर्वी  हेरंब ओक ने  एक बझ सुरु केला  होता. त्यावर दररोजच्या मटा मधल्या चुका लिहिल्या जात होत्या.  त्या चुकांच्या बद्दल   इथे लिहायला जागा पण पुरणार नाही, म्हणून इथे त्या बझची लिंक देतो आहे. हा  बझ नक्की पहा   . बझ पहाण्यासाठी तुम्हाला फक्त जी मेल वर लॉग इन करावे लागेल, आणि नंतर मग लिंक उघडेल. एखाद्या राष्ट्रिय पातळीवरच्या एखाद्या वृत्तपत्राला स्वतःच्या लिखाणाच्या क्वॉलिटी बद्दल काही खात्री नसल्याने   पेज हिट्स साठी अशा प्रकारचे फोटॊ पोस्ट करावे लागत असावे, या पेक्षा दुर्दैवाची गोष्ट काय असेल ?
’मटाबाबा डॉट कॉम’  चा पुन्हा लवकरच ’मटा, पत्र नव्हे मित्र ’व्हावा या अपेक्षेत  असलेला एक मटा वाचक………
सकाळ पण काही या बाबतीत मागे नाही. तुम्हाला स्वतःचा अपमान करून घ्यायचा आहे का? मग सकाळमधे लेख लिहा.
नेट वरच्या सकाळ मधे आलेल्या लेखावरच्या कॉमेंट्स लेखकाचा पुरेपूर अपमान करणाऱ्या असतात. कॉमेंट्स साठी पण मॉडरेशन आहे, तरीही मुद्दाम मॉडरेट करुन  लेखकाचा अपमान करणाऱ्या कॉमेंट्स पब्लिश करण्यामधे सकाळचा कोणीच हात धरू शकत नाही.
मी मान्य करतो, की त्या कॉमेंट्स बरेचदा लेखापेक्षा पण जास्त करमणूक करतात. मला पण वाचायला आवडतात. पण  एखाद्याने आपला लेख सकाळ कडे छापायला पाठवला की त्याचा अर्थ हा नाही की लेखकाने सकाळच्या साईट वर स्वतःचा अपमान करून घेण्यासाठी लेख छापण्यासाठी सकाळला परवानगी दिलेली आहे.
आजकाल तर सकाळच्या प्रत्येकच पानावर ऍड्स लावलेल्या आहेत. कुठेही क्लिक केले की बाजूला जाहिरात उघडते. पैसे कमावण्यासाठी इतक्या लो लेव्हलला जाण्याची खरंच काही गरज नाही.प्राजक्ता पटवर्धनची एक सुंदर कविता पण या सकाळने सोडली नाही. त्यावर पण एकफालतू कॉमेंट दिलीच. अशा कॉमेंट्स साठी सोशल साईट्स आहेत. सकाळने ती कॉमेंट पब्लिश केली नसती तरीही चालले असते.पण कॉंट्रोव्हर्सी सुरु करून पेज हिट्स वाढवणे  हा मुख्य  उद्देश असतो.
मुक्तपीठ हे तर सर्वसामान्य लोकांचे लेख छापण्यासाठी सुरु केले होते. पण हल्ली काय होतं मुक्तपीठ?? मुपी वर लेख लिहिणारे सर्वसामान्य लोकं असतात, कधी पेपर मधे नांव वगैरे छापून न आलेले- आणि  लिहिण्याची सवय नसलेले, नॉन प्रोफेशनल रायटर्स. एखाद्या वेळेस पेपर मधे नांव आलं, की उगाच आनंद होतो.   आपण खूप काही मिळवलं असं वाटतं. एखादा लेख आला की ताबडतोब त्या लेखावर कॉमेंट्स चा मारा सुरु होतो.लेखकाने जर पुन्हा येऊन कॉमेंट्स पाहिल्या , तर त्याला इतकं वाईट वाटावं की आपण झक मारली आणि सकाळला लेख छापायची परवानगी दिली.मुक्तपीठ हे  नवोदिताना संधी देण्यासाठी नाही तर त्यांचा अपमान करण्यासाठी सुरु केले आहे का हा प्रश्न नेहेमीच पडतो मला!
इतरही पेपर मधे अशा प्रकारचे लेख असतातच, पण त्यावर अशा सकाळ प्रमाणे अपमान करणाऱ्या  कॉमेंट्स पब्लिश  करून लेखकाचा अपमान केला जात नाही.
हे असे चीप प्रकार सकाळ मधे नेहेमीच सुरु असतात. लेखकाची हुर्यो उडवा, अपमान करा, कशाही कॉमेंट्स पब्लिश करा,म्हणजे लोकं पुन्हा पुन्हा त्या कॉमेंट्स   वाचायला येतात . सकाळचा संपादकीय विभाग पण मुद्दाम  अशा कॉमेंट्स अप्रुव्ह करतो यावरून त्यांची पेज हिट्स वाढवायची ही स्ट्रॅटेजी आहे हे लक्षात येते. कॉमेंट मॉडरेशन एनेबल केलेले आहे, प्रत्येक कॉमेंट नीट तपासून मग नंतरच प्रसिद्ध  केली जाते.  मला वाटत की कॉमॆंट लेखकाची अपमान करणारी असेल तरच फक्त प्रसिद्ध केली जावी असा नियम आहे .सगळा संपादकीय विभागच या अशा खेळात मग्न आहे. टी आर पी , पेज हीट्स वाढवण्यासाठी अगदी  मुख्य बातम्यांवर पण अशाच चीप कॉमेंट्स प्रसिद्ध केल्या जातात.
सकाळची ही  मनोवृत्ती बदलली पाहिजे नाहीतर एक चीप थर्ड  रेट पेपर पेक्षा जास्त काही किम्मत रहाणार नाही या पेपरला – कमीत कमी माझ्या नजरेत तरी.

0 comments:

Post a Comment