Powered by Blogger.

Saturday, 28 April 2012

का?

प्रत्येक वेळेस, प्रत्येक ठिकाणी तो ‘का?’ येतो. सकाळी उठून वर्तमानपत्र उघडतो. बातम्या वाचू लागताच तो ‘का?’ डोकावू लागतो. आवरून देवळात जातो. देवासमोर नतमस्तक होतो. थोड्याच वेळात दर्शनावरून मनात गोंधळ होतो. देवाच्या दर्शनाचा उद्येशाने आलेलो. पण दर्शन घेतले त्या ‘दानपेटीचे’. देवळात देवासमोरच दानपेटी ‘का?’ म्हणत ‘का?’ येतो. या विचाराने मन खजील होते.
कंपनीत जाण्यासाठी मोटारसायकल काढतो. खड्यांतून ‘मार्ग’ काढतांना ‘अस का?’ विचारात ‘का?’ सोबत असल्याची जाणीव करून देतो. चौकात उभा असलेला हवालदार दिसतो. त्याच्याच बाजूला उभी असलेली त्याची मोटारसायकल पाहून ‘यांना नियम लागू होत नाहीत का?’ असा विचार मनात घोळतो. आणि या विचारासोबत तो ‘का?’ येतो. कंपनीत कामाला सुरवात होते. काम वेळेत पूर्ण करण्याच्या ओघात दिवस कधी मावळतो ते कळतही नाही. घरी येतांना रेल्वे स्टेशन, आणि शहराच्या सुरवातीला नजर जाईल तिथपर्यंत पसरलेल्या झोपडपट्या पाहून देखील तो का? येतो. रात्री जेवतांना टीव्ही सुरु करतो. आणि ‘का?’ अगदी वेळेवर पोहोचतो. त्यानंतर तो ‘का?’ मुळीच पाठ सोडत नाही.
सोनीच्या ‘सीआयडी टीम’ला पाहून पुणे-मुंबई पासून दिल्लीला झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यांच्या गुन्हेगारांचा तपास त्यांच्याकडे का सोपवत नाही? असाही ‘दुधखुळ्या’ विचारात तो ‘का?’ असतोच. द्वी-सप्ताहातून हमखास येणारी भाववाढीची बातमी, आणि दोन महिन्यातून किमान एकदा येणारी राष्ट्रीय नेत्यांच्या परदेश दौरयाची बातमी पाहून. हे राहू, केतू आमच्याच नशिबी का? म्हणत का? उभा राहतो. हा ‘का?’ का सारखा येतो? मग मन त्रागा करू लागते. मनस्ताप वाढू लागतो. निवडणूक आल्यावर मी माझा राग माझ्या ‘मताद्वारे’ नोंदवतो. सत्ताधारी पक्षाचा उमेदवार पडलेला असतो. परंतु, सत्तेची माळ त्याच भ्रष्ट पक्षांकडे असते. मग मात्र, का? प्रश्नावली भंडावून सोडते. मन शांत करण्यासाठी मी त्याची करमणूक करतो.
चित्रपटांचा आणि संगीताचा आधार घेतो. चित्रपटात पाहतांना ‘का?’ सोबत ‘कशाला?’ सुद्धा येतो. चित्रपट पाहून आपली चित्रपटसृष्टी इतकी ‘फेकू’ आहे यावर विश्वासच बसेनासा होतो. मग तो चित्रपट ‘बनवणारा’ मुर्ख की ‘पाहणारा’ मुर्ख असा हास्यास्पद विचार मनात येतात. रात्री घरी येतांना ‘का?’ सारखा का येतो? असा प्रश्न निर्माण होतो. स्वतः तर काही दोष नाहीत ना असाही विचार मनाला चाटून जातो. रात्री उद्विग्नता वाढते. सकाळी डोळे उघडतो आणि.. परत ‘तो’ नव्याने येतो..

0 comments:

Post a Comment