Powered by Blogger.

Wednesday, 23 May 2012

हिंदु …

भगवा रंग… झाकोळला गेलाय.
संत तुकाराम, रामदास स्वामींनी खांद्यावर दिलेली भगव्या रंगाची पताका घेउन जेंव्हा  शिवाजी महाराज जिजाऊंच्या समोर उभे राहिले असतील, आणि आपला हिंदूपदपातशाही स्थापन करण्याचा निर्णय सांगितला असेल तेंव्हा जिजाऊंच्या डॊळ्यात पाणी नक्कीच तराळले असेल नाही का?? मग त्या पाणी भरलेल्या डोळ्य़ांनी जेंव्हा आपल्या १६- १७ वर्षाच्या मुलाच्या डोक्यावर त्या माऊलीने आपला हात ठेऊन आशीर्वाद दिला असेल तेंव्हा शिवरायांच्या मनातल्या त्या हिंदूपदपातशाही स्थापन करण्याचे स्वप्न कधी ना कधी तरी पुर्ण होईलच अशी खात्री असेलच, म्हणूनच त्या माऊलीने आपल्या काळजाच्या तुकड्याला हातामधे तलवार घेऊन बाहेर जाऊ दिले असेल .
दुर्दैवाने आज पर्यंत  ते स्वप्न   पुर्ण झाले नाही- आणि कधी होण्याची अपेक्षाही नाही. ’स्वराज्य’ तर मिळाले, पण ’सुराज्य’ मिळायची आम्ही अजूनही वाट पहातोय.   हिंदूपदपातशाही स्थापनेच्या स्वप्नाला तर नेत्यांनी सरळ………असो लिहित नाही जास्त, कारण विनाकारण विषयांतर होईल.
स्वतःला हिंदू  म्हणवून घेण्या पेक्षा निधर्मी म्हणवून घेण्याकडे आपल्या नेत्यांचा  कल वाढतोय. लोकांना अभिमान वाटतोय  हिंदू म्हणवून घेण्यापेक्षा निधर्मी   म्हणवून घेण्याचा.  हिंदुस्थानचा भारत कधी झाला ते समजलेच नाही.
शिवरायांनी आपल्या मावळ्यांच्या खांद्यावर दिलेल्या त्या भगव्या रंगाच्या ध्वजाचे आज काय झाले आहे? प्रत्येक पक्षाने त्यामधे आपले वेगवेगळे स्वार्थाने लडबडलेले  ’बेगडी’ रंग मिसळून भगव्याची  पार  वाताहात करून टाकली आहे.  कोणी त्यामधे हिरवा,  कोणी हिरवा +निळा ,  मिसळतो , तर कुठला तरी एखादा पक्ष आपला निधर्मी स्वरूप एंडॉर्स करायला पांढरा रंग पण  वापरतो.
दुर्दैवाने आज  प्रत्येकच पक्षाला शिवाजी महाराजांची आठवण येते ती फक्त राजकारणासाठी! त्यांचं स्वप्न होतं हिंदवी स्वराज्य  स्थापन करणे.  ज्यांच्या खांद्यावर विश्वासाने धुरा दिली होती , त्यांनी आपली जबाबदारी हे आपल्या  खांद्यावरचं हे भगव्या रंगाचं “ओझं” आहे असे समजून काढून फेकण्यात, आणि निधर्मी रंगीबेरंगी झेंडे घेऊन नाचण्यात  मोठेपण मानतात.
अरे कशासाठी त्या माऊलीने आपल्या लेकराला घोड्यावर बसवून उन्हातान्हात  लढायला पाठवले होते?? कशासाठी शेकडॊ मावळ्यांनी   आपला जीव दिला ??  श्री  शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारी हिंदूपदपातशाही होती ती हीच का?? हा प्रश्न मला कालपासून छळतोय.
कालच एक बातमी वाचली.  फ्रान्स सरकारने बुरखा घालण्याकरता कायद्याने बंदी घातली आहेच. आता अशी बातमी आहे की आता फ्रान्स चे  सरकार बहुपत्नित्वाचा कायदा रद्द करणार आहे. कुठल्याही धर्माच्या लोकांना एका पेक्षा जास्त लग्नं करण्यात येणार नाहीत. बऱ्याच लोकांचे नागरीकत्व रद्द होण्याचे चान्सेस पण आहेत. त्या पार्श्वभूमीवर    आपल्या सरकारचे बोटचेपे धोरण मात्र बरेचदा मनःस्ताप देऊन जाते.
सरकारने तर हिंदू असल्याबद्दल जिझिया कर तर लावलेला नाही, पण  हिंदू असल्याबद्दल तुम्हाला लाज वाटावी असे वागणे  निश्चितच सुरु केले आहे.  कदाचित त्या दिशेने वाटचालही सुरु आहे.
तूम्ही हिंदू आहात?? तुम्हाला शिक्षणाचा अधिकार कशाला हवा?? बुट पॉलीश करा, रामागडी म्हणून कामं करा, गेला बाजार, भाजी विका, मासे विका, .. शिक्षण ?? छे …  ते   तुमच्या साठी   नाही- आणि जर तरीही शिकायची इच्छा असेलच, तर पदरचे पैसे खर्च करून शिका!.
सरकारने इतर सगळ्या धर्मियांना  जास्तीत जास्त फॅसिलिटीज द्यायच्या आणि हिंदूंना मात्र शक्य तितके ताणायचे असे धोरण अवलंबिले आहे. लांगूलचालनाची परंपरा मात्र काही राजकीय पक्ष अगदी इमाने इतबारे  आणि काटॆकोर पणे जोपासताहेत. . असो!!
यावर
एक छान लेख वाचला होता आणि त्यावर लिहिण्याचे बरेच दिवसांपासून मनात होते पण नंतर राहून गेले .   त्या लेखा मधे एक पत्र लावलेले दिसले, ते इथे पेस्ट करतोय. त्याबद्दल  जास्त काही लिहिण्याची आवश्यकता नाही. पत्र वाचले की सगळे समजेल.
शेवटी एकच सांगावंसं वाटतं..महाराज, आम्हाला क्षमा करा. आम्ही चुकलो.. आपल्याला अभिप्रेत असलेला हिंदुस्थान आणि हिंदुपदपातशाही   आम्हाला समजलीच नाही.

अंबानींचं घर

ambaniमुकेश अंबानी  करोडॊ रुपये किमतिचं घर बांधताहेत अल्टमाउंट रोडला , मुंबईला. प्लॉट्ची साइझ तशी मॉडरेट आहे .. फक्त ४५३२ स्क्वेअर मिटर्स.. म्हणजे साधारण ४५ हजार स्क्वेअर फुट. ही जागा अंबानींनी २००२ मधे विकत घेतली होती.त्याच्या बद्दल खरं तर बरंच येउन गेलंय.. पण इथे एक फोटॊ पोस्ट करतोय..आणि थोडक्यात माहिती दिलेली आहे खाली.
२७ मजले.. काचेच्या तावदानांचा पुढचा भाग असलेली बिल्डींग असेल ही.  या बिल्डींग मधे १६० कार्स आणि तिने हेलिपॅडची सोय असेल.
इतकं मोठं घरं म्हंटलं की नोकर माणसं आलितंच. म्हणुन जवळपास ६०० स्टाफची सोय असेल इथे .
घराच्या प्लॅन प्रमाणे १७३ मिटर उंचिची बिल्डींग असेल ही. जर एखादी रेगुलर बिल्डींग असती तर एवढ्या उंचिच्या बिल्डींग मधे ६० मजले उभे केले असते बिल्डरने. पण इथे तसं नाही. फक्त २७ मजलेच आहेत.
असं म्हणतात की खालचे सहा मजले फक्त पार्किंग करताच राखिव आहेत. जवळपास १६८ इम्पोर्टेड कार्स पार्क करण्याची व्यवस्था इथे केल्या गेली आहे.
एका मजल्यावर एक फुल फ्लेज्ड सिनेमा हॉल कम एंटरटेनमेंट सेंटर असेल. ह्या मधे काय काय एंटरटेनमेंट असेल हे तर अजुन फारसं कळलेलं नाही. पण सिनेमा व्यतिरिक्त पण बऱ्याच गोष्टी असाव्यात.. जसे स्क्वॅश कोर्ट, टेनिस कोर्ट, इन डॊअर स्विमिंग पुल, जिम.. वगैरे..
मिनी थिएटरचा रुफ टॉप हा गार्डन साठी असेल. आणि वरच्या बाल्कनी मधे पण टेरेस गार्डन असेल.  टेरेस गार्डन म्हंटलं की मला आपलं ते चार पाच कुंड्या बाल्कनीत ठेऊन त्यात लावलेले क्रोटन्स आठवतात.. पण तसं नाही हं इथे.. :)
नऊवा दहावा आणि अकरावा फ्लोर हा हेल्थ फोअर म्हणुन इअर मार्क केला गेलाय. इथे स्विमिंग पुल, अथलेटीक गेम्स कोर्ट,वगैरे असेल.
त्याच्यावरचे दोन मजले अंबानी परिवाराच्या गेस्ट लोकांसाठी असतिल. सगळ्यात वरचे चार मजले जे अरेबियन सी चा व्ह्यु देतिल, ते सगळे मुकेश आणि त्याच्या बायको आणि दोन मुलांसाठी आहेत. म्हणजे प्रत्येक मजल्यावर फक्त एकच जण रहाणार.
ह्यांच्या घराच्या वरचे दोन फ्लोअर्स हे मेंटेनन्स एरिया म्हणून रहातिल . आणि सगळ्यात वर एअर स्पेस फ्लोअर असेल.
ह्या घराची एस्टीमेटेड किंमत आहे. ४००० करोड….. हुश्श.. समोर किती शुन्य द्यायचे हे न कळल्यामुळॆ शब्दामधे करोड लिहिलंय..

प्रेमात पडलेल्यांची लक्षणं….

बरेचदा असं होतं, की  लोकं प्रेमात पडलेले असतात, पण त्यांचं त्यांनाच समजत नाही की आपण खरंच प्रेमात पडलोय म्हणुन.  तर अशा लोकांसाठी त्यांना समजावं की आपण प्रेमात पडलो आहोत म्हणुन मुद्दाम हे पोस्ट टाकतोय. प्रेमात पडलेल्यांची लक्षणं. तुम्ही स्वतःला या मधली किती लक्षणं लागु होतात ते पहा, आणि या प्रेम रोगावर ’योग्य’ रिपिट ’योग्य’ ते उपचार करुन घ्या..
१) जिच्यावर प्रेम आहे तिच्या व्यतिरिक्त  जगातिल  प्रत्येकच मुलगी दिसायला ’तिच्यपेक्षा डावी’ दिसु लागते. मग यामधे  ऐश्वर्या रायचा फोटो जरी समोर ठेवला, तर ऐश्वर्याचं पण नाक वाकडं दिसु लागतं..
२) प्रत्येकच वस्तु मधे तिचा चेहेरा दिसु लागतो.  जिथे पहावं तिथे ती आहे असा भास होतो.
३) फोनची रिंग वाजली की  तुम्ही फोन कडे धावता, तिचाच फोन आला असावा असं वाट्तं रहातं सारख.
४) एकदा तिच्याशी फोन वर बोलणं सुरु झालं की ते कधी संपुच नये असं वाटतं. फोन ठेवतांना तिने फोन बंद केल्याशिवाय तुम्ही हॅंग करित नाही.
५) तिच्या प्रत्येक ’मिसकॉल’ची आतुरतेने तुम्ही वाट पहात असता. आणि मिसकॉल मिस होण्यापुर्वीच कॉल बॅक करता. आपल्या प्रिपेड कार्डच्या बॅलन्स ची केअर न करता…
६) मित्रांशी तुम्ही खोटं बोलणं सुरु करता.
७) स्टॅग पार्टीला जाउन मित्रांबरोबर मस्ती करण्यापेक्षा   तिच्या बरोबर पेटीकोट,भाजी, ओढणी सारख्या  फालतु गोष्टी शॉपिंगला जाणं तुम्हाला जास्त महत्वाचं वाटू लागतं.
८) तिच्या बरोबर अगदी रडूबाई सिनेमा पण तुम्ही आवडिने पहाण्यास तयार असता. प्रसंगी न कळणाऱ्या भाषेतिल चित्रपट जसे शंकराभरणम वगैरे पण तुम्ही ’आवडीने’ पहाता .
९)जगातली सगळ्यात सुंदर मुलगी म्हणजे ’ती’च हे अगदी पक्कं बसतं मनामधे.. आणि ते मत म्हणजे  काळ्या दगडावरची रेघ असते.
१०) आईने / वडिलांनी हाक मारली तरी पण ऐकु येत नाही
११) सिध्दीविनायकाच्या ट्रिप्स वाढल्या असतात.
१२) क्लास मधे शिकवत असतांना लेक्चरर पेक्षा तिच्या कडे जास्त लक्ष जातं.
१३) कोरा कागद, आणि पेन सापडला, की त्यावर आपोआप तिचंच नाव लिहिलं जातं
१४) दुकानात नविन पेन विकत घ्यायला गेलात, तरी पण लिहुन पहातांना स्वतःच्या नावा ऐवजी तिचंच नांव लिहुन पेन चेक करता.
१५)बॉस ला फोन करायला म्हणुन रिसिव्हर उचलता, आणि तिचा नंबर डायल करता.
१६)कुठेही वर्तुळाकार वस्तु दिसली की त्या मधे तिचाच चेहेरा दिसणं सुरु होतं.
१७)शिर्डीच्या साईबाबाचा दोरा हाताला बांधला असतो. प्रत्येक मंदिरासमोर येता जाता हात जोडुन उभे राहिल्याशिवाय बरं वाटत नाही.
१८)ऑफिसचा रस्ता तिच्या घरासमोरुन जातो. आता ऑफिस पश्चिमेला आणि तिचं घर पुर्वेला असलं तरीही..
१९)तिच्या भावाशी मैत्री करण्यासाठी तुम्ही काहिही करण्यास तयार असता.
२०) तिचे मित्र मैत्रीणी आपले पण मित्र व्हावेत म्हणुन तुम्ही पदरचे पैसे खर्च करायला पण तयार होता. केवळ तिचा सहवास लाभावा म्हणुन..
२१)तिला आवडतं म्हणुन तुम्ही अगदी चाटवाल्या भैय्याच्या गाडिवर -(ज्याला तुम्ही नेहेमी शिव्या घालता, घाणेरडा म्हणुन )तिच्या सोबत उभे राहुन चाट आवडिने खाता..
२२) तिचे वडिल दिसले की तुम्ही अगदी शालिनपणाचा मुखवटा पांघरुन ( कारण तुम्ही शालिन नाही हे मला माहिती आहे ) त्यांना गुड मॉर्निंग , गुड इव्हिनिंग, किंवा हॅव अ नाइस डे अंकल करता तेंव्हा.. नक्कीच!!
२३)तिच्या भावाला बुलेटवर बसुन येतांना तुम्हाला साक्षात यमराज रेड्यावर बसुन आल्याचा भास होतो.
२४)तुम्ही बुक एक्झीबिशन मधे मुद्दाम जाता आणि शेर ओ शायरी, किंवा गझल्स ची पुस्तकं  विकत आणता.
२५) रॅप, किंवा डीस्को ऐवजी तुम्हाला गझल ऐकत रहाणं आवडतं . तलत मेहमुद एकदम फेवरेट सिंगर बनतो. या जगात फक्त तलत चा आवाज शाश्वत आहे बस्स.. बाकी सब कुछ झुट है! असं वाटु लागतं.
२६)तिला आवडतो ,म्हणुन तुम्ही गुलाबी किंवा पर्पल कलर चा शर्ट विकत घेता आणि आवडिने घालता..
२७)एकटे बसले असला की दिवा स्वप्न पहाणं सुरु करता.त्या स्वप्नात केवळ तुम्ही आणि ती.. बस इतर कोणिच नसतं. लोकांना ब्लॅक ऍंड व्हाईट स्वप्न पडतात, तर तुम्हाला कलर!!
२८)झोपेचं पार खोबरं होतं. रात्री तासन तास तुम्ही तळमळत काढता तिच्या आठवणीत..
२९)तुमचे ऑफिस जरी १० वाजता असले, तरी तिच्या वेळेवर म्हणजे सकाळी ८ वाजता तुम्ही घरुन निघता, आणि तिच्याच बसने प्रवास करता.
३०) सिनेमाची हिरोइन पण तिच्या सारखीच दिसायला लागते, आणि हिरो तुमच्या सारखा.
३१)तिच्या नावाच्या स्पेलिंगचं प्रत्येक अक्षर सेक्सी दिसु लागतं.
३२) तिच्या कडे पाहिलं की ताजमहाल पाहिल्याचं समाधान मिळतं.
३३)तिच्या नावातले, आणि तुमच्या नावातले कॉमन अक्षरं तुम्ही शोधुन त्यांची न्युमरॉलॉजी ने व्हॅल्यु काढता..
३४) तुम्ही मेसेंजर वर नेहेमी अदृष्य रहाता, ती आल्यावर इतर मित्रांनी त्रास देउ नये म्हणुन..  आणि तुम्हाला फक्त तिच्याशीच चॅट करायला आवडतं . चॅटींग कमित कमी दोन तास.. एका बैठकीत..
३५)मित्रांनी बोलावलं, तर टाळुन तिच्या घरासमोर जाउन टाइम पास करणं तुम्हाला जास्त आवडतं.
३६) तिच्या कॉलेज समोरचा कॅंटीनवाला तुम्हाला उधार द्यायला पण तयार होईल इतके वेळा तुम्ही तिथे जाउन बसता.
३७)कपड्यांच्या बाबतीत तुम्ही खुप सेंटीमेंटल होता. आणि नेहेमी अगदी अप टु डेट रहाता.. काय सांगावं ती कधी भेटेल ते??
३८)जगातली सगळ्यात सुंदर भाषा म्हणजे उर्दू ( जरी येत नसली तरीही) वाटू लागते. मराठी एकदम डाउन मार्केट.
३९)अरुण दाते एकदम फेवरेट सिंगर होतो. मग दिवस तुझे हे फुलायचे ऐकलं, की तिचा चेहेरा डोळ्यापुढे येतो.
४०) नॅटकिंग कोल चे लव्हसॉंग्ज पण खुप आवडायला लागतात..
४१)गुलाम अलीचा मधाळ आवाज हदयाला घरं पाडतो, आणि शक्य होईल तेंव्हा तुम्ही ऐकत असता ही गाणी. बरेचदा बडे गुलाम अली खां पण ऐकायचा प्रयत्न करता तुम्ही.
४२)भुक वगैरे काही लागत नाही, उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म या उक्ती प्रमाणे जे काही पानात पडेल ते तुम्ही न कुरकुरता खाता. अगदी शेपुची भाजी सुद्धा.आणि जर आईने आश्चर्याने पाहिलं तर शेपु कसा तब्येतिला चांगला, यावर पण बोलता..
४३) भांग व्यवस्थित मनासारखा जमल्याशिवाय आणि कपड्यांना कडक इस्त्री असल्याशिवाय  घराबाहेर पाउल पडत नाही , ( काय सांगावं ती कधी भेटली तर कुठे??).
४४)ऑर्कुट स्क्रॅप या कम्युनिटीला जॉइन करुन रोज तिला नविन कुठला स्क्रॅप पाठवायचा याची काळजी करित बसता.
४५) तिच्या फ्रेंड लिस्ट मधे एखादा ’नको असलेला’ तर ऍड होत नाही, याची खात्री करुन घेण्यासाठी तिच्या फ्रेंड्स्च्या प्रोफाइलला रेग्युलरली मॉनिटर करता.
४६)लव्ह, प्रेम, प्यार शब्द असलेले एस एम एस शोधुन तिला पाठवता..
४७) तिला गुड मॉर्निंग म्हंटल्या शिवाय तुमचा दिवस सुरु होत नाही, आणि गुड नाईट म्हंटल्याशिवाय रात्र!!
४८)तिच्याशिवाय हे जीवन व्यर्थ आहे असे वाटु लागते.
४९)तिला पहायला कोणी आलं की तुमचा जीव कासाविस होतो, आणि तुमच्या मंदिराच्या फेऱ्या सुरु होतात.
५०)तुमचे संध्याकाळी पाच वाजता भेटायचे ठरले असतांना, तुम्ही मात्र चक्क एक तास भर आधी तिथे जाउन तिची वाट पहाता.. अजिबात कुरकुर न करता.वाट बघतांना एक एक सेकंद तुम्हाला एक एक युगा प्रमाणे वाटतो , आणि दर दोन मिनिटांनी तुम्ही घड्याळाकडे पहाता..
५१)समोर कागद – पेन असेल तर तुम्ही  सौ. तिचं नाव+ तुमचं नाव+ तुमचं आडनाव लिहुन पहाता,आणि खुळ्यासारखे स्वतःशीच हसता.
५२)?????
अजुन बरेच काही असतिल पण इथे थांबतो आता. पुढची लक्षणं तुम्ही स्वतःचा लिहा खाली कॉमेंट्स मधे..
( आणि हो.. प्रेमात न पडलेल्यांची लक्षणं लवकरच.. पुढल्या शनिवारी पोस्ट करणार  आहे.. )

फ्लर्टींग

सला विषय घेतलाय लिहायला आज- माझं मलाच कळत नाही. कदाचित गोव्याला येण्याचा परिणाम असावा हा. एका मित्राच्या मुलीचे लग्न आहे आज, आणि त्या साठी गोव्याला आलोय. संध्याकाळी फिरायला चौपाटीवर गेलो होतो, तेंव्हा समुद्र किनाऱ्यावर एक मुलींचा कंपू दिसला. बहुतेक कुठल्यातरी कॉलेजची सहल असावी. काही मुलं पण बरोबर होती. त्या मधला एक मुलगा उगाचच त्या मुलींच्या पुढे पुढे करीत होता. काही खास ’लक्ष्य’ न ठेवता नुसतं पुढे पुढे केल्याने काहीच फायदा होत नसतो हे त्याला समजले नव्हते बहुतेक. मी समोरच रेती वर बसलो होतो, आणि निरीक्षण केलं, तर आता पुढे पुढे म्हणजे – उगाच मोठमोठ्याने काहीतरी बोलत होता, आणि निरर्थक बोलत होता.
गोव्याच्या समुद्रावर दोन प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे सुटी काढून मजा करायला आलेले, आणि दुसरे म्हणजे एकटे काही कामा निमित्त गोव्याला आलेले, आता संध्याकाळी वेळ जात नाही म्हणून समुद्रावर फिरायला आलेले. दुसर्‍या प्रकारचे लोक हे ’बघे’ या प्रकारात मोडतात. काही करायचं नसतं, मग एखाद्या शॅक मधे बिअरचे घोट घेत इकडे तिकडे (???) बघत वेळ घालवायचा झालं!! तर मी इथे गोव्याला बघ्याच्या आणि एकांड्या शिलेदारांच्या भूमिकेत होतो, म्हणून प्रकर्षाने जाणवलं इतकंच.
जगामधे खरं तर दोनच जाती आहेत. एक नर आणि दुसरी मादी. नराने मादीच्या भोवती रुंजी घालायची हे सगळ्या पक्षां मधे पण दिसून येते. त्या साठी देवाने पण नर पक्षाला सौंदर्य दिलेलं असतं. चिमणा बघा कसा ऐटदार दिसतो, गळ्याभोवती छान काळी आयाळ असल्याप्रमाणे काळा ठिपका, थोडासाच मोठा असलेला आकार, त्याच प्रमाणे कोंबडा मस्त पैकी डोक्यावर तुर्रा घेउन कोंबड्यांच्या भोवती कुचकुचत गोल गोल फिरणारा, वर आभाळाकडे बघून पिसारा फुलवत लांडोरीला केकारव करत साद घालणारा… या सगळ्यांकडे बघितलं की देवाने ’नराला’ मादीला आकर्षित करुन घेण्यासाठीच हे सगळं काही दिलंय असं वाटतं. मादीला मात्र काहीच करावे लागत नाही. फक्त नराची निवड करायची असते. फ्लर्टींग इथे पण असतंच! आणि अगदी हेच नियम पुरुष स्त्री ला पण लागू ठरतात.
पुरुष अथवा स्त्री कितीही वयाचे असो, फ्लर्टींग बद्दल कधीच आकस नसतो. ६५-७० वर्षांच्या आजी पण जेंव्हा मॅचिंग ब्लाऊज शिवाय साडी नेसत नाहीत, किंवा बाहेर पडतांना पावडर कुंकू केल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत… तसेच आजोबा पण अजूनही ६५ ला आले तरीही ते जिन्स घालतात आणि सोबतच नायकेचे बूट घालून फिरायला जातात हे सगळं कशाचं लक्षण म्हणायचं? प्रत्येक स्त्रीला पुरुषांनी आणि पुरुषाला स्त्री ने एकदा तरी आपल्याकडे वळून पाहिलंच पाहिजे असं वाटत असतं! या मधे लैंगिक भावना असते असे नाही, पण विरुद्ध लिंगी असे जन्मतःच असलेले नैसर्गिक आकर्षण असते. अर्थात ’गे’लेले काही अपवाद वगळून.
पक्षी आणि मानव या मधे मुख्य फरक एकच – तो म्हणजे पक्षी खुलेआम मादीला आकर्षित करायला फ्लर्ट करतात, पण मानव मात्र चुपके चुपके हा प्रयत्न करीत असतात. खूप मजेशीर खेळ आहे हा, प्रत्येकालाच खेळायला आवडतो.. खेल खेल मे हा ऋषीकपूरचा सिनेमा मला खूप आवडायचा . डझनभर तरी वेळा पाहिला असेल. त्या सिनेमामधे दाखवलेले फ्लर्टींग इतकं रोमॅंटीक वाटायचं, की आपणही तसंच कुणाला तरी गाठावं असं वाटायचं. :)
पुरुषांना काही सुंदर पिसारा दिलेला नसतो मोरा प्रमाणे, किंवा सिंहा प्रमाणे आयाळ पण नसते. त्या मुळे स्त्रीयांना आकर्षित करायला खास प्रयत्न करावे लागतात. हेच खरे कारण आहे की फ्लर्ट करणे हे थोडे अवघड होते पुरुषांना. पण ते खरंच इतकं अवघड असतं कां? मला नाही वाटत!! इथे थोडं लिहितोय त्या बद्दल.
फ्लर्ट करता येण्यासाठी सर्वप्रथम एक मुलगी पाहिजे – ती कुठलीही चालेल, तुमच्या कंपूमधली, ओळखीमधली, मैत्रीण, बहिणीची मैत्रीण कोणीही चालेल, आणि तुम्हाला तिच्या बद्दल काही तरी वाटत असायला पाहिजे. एकदा भेट झाली की तुम्हाला कुठल्याही विषयावर बोलता यायला हवं, एखाद्या विषयावर बोलणं सुरु केलं, आणि लक्षात आलं, की तिला त्या विषयात रस नाही, की ताबडतोब विषय बदलता यायलाच हवा. आणि ज्याला हे व्यवस्थित जमतं तो जिंकला. तिने तुम्हाला पाहिलं, तुम्ही तिला पाहिलं, पहिली छाप ही केवळ बोलण्यावरूनच पडते. तुम्ही काय कपडे घातले आहेत, किंवा तुम्ही कसे दिसता या पेक्षा तुमचे वागणे, आणि तुम्ही कसे बोलता हे जास्त महत्वाचे ठरते. फ्लर्टींगची पहिली शिडी म्हणजे गप्पा गोष्टी . तुम्ही ह्यात जितके तरबेज – तितके फ्लर्टींगमध्ये यशस्वी होण्याची शक्यता जास्त.
कुठल्याही विषयावर बोलणं सुरु केलं, आणि एकदा तिच्या आवडीचा विषय आहे हे लक्षात आलं, की मग त्याच विषयावर चिकटून रहाणं, आणि विषयापासून वहावत न जाता आत्मविश्वासाने बोलत रहाणं ( प्रसंगी अती-आत्मविश्वासाने) हे पण महत्वाचे आहे. नाहीतर तुम्ही तुमच्याच नकळत तिच्या आवडीच्या विषयावरुन तुमच्या आवडीच्या विषयाकडे कसे जाता हे लक्षातही येत नाही, आणि ती कंटाळते. . असं होऊ नये याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. इथे थोडी काळजी घ्यायलाच हवी नाहीतर तिला तुमच्या सहवासाचा पण कंटाळा येऊ शकतो, आणि एकदा ’कंटाळवाणा प्राणी’ हा शिक्का बसला की सगळं संपलंच..आयुष्यभर मैत्रीण मिळणार नाही हे नक्की. इथे पुन्हा फ्लर्टींगचाच एक भाग असतो ही तरूणपणी असलेली मैत्री म्हणजे.
सुरुवातीला तिचा क्वॉंटम फिजिक्स मधला रस किंवा एचटीएमएल मधले प्राविण्य तुम्हाला माहिती असेल तरीही सुरुवात ही विनोदी गोष्टींपासून केली तर कधीही चांगले .कितीही गंभीर स्वभावाची स्त्री असली तरीही हा विषय सदाबहार असतो. तिला हसवत ठेवणे, आनंदी ठेवणे हा मुख्य उद्देश आहे. जरी ती क्वॉंटम फिजिक्स मधे पिएचडी /पोस्ट ग्रॅज्युएशन करित असेल तरीही तिचा आवडीचा विषय तो नसतो – बरेचदा ती एक गरज म्हणून अंगीकारली  असते हे लक्षात घ्या. नुसते विनोदावर ची पु्स्तकं वाचून विनोद सांगू नका. एसएमएस वर आलेले विनोद कदाचित तिला पण आलेले असतात त्या मुळे ते शक्यतो टाळा, किंवा सांगण्यापूर्वी विचारा, हा एसएमएस आलाय का तूला म्हणून?
प्रत्येकच मुलीला आपण सगळ्या कंपूमधे जास्त आकर्षक आहोत असे वाटत असते. ( ते खरे आहे की नाही हे महत्वाचे नाही) स्वतः जगत सुंदरी असल्याचा त्यांचा अघोषित दावा असतो. अर्थातच तिच्या कडे जास्तीत जास्त लक्ष दिले जावे अशी तिची सुप्त इच्छा असते. आपल्याला एखाद्या राजकन्येसारखी वागणूक मिळावी अशी तिची अपेक्षा असते, आणि जो कोणी हे करेल तो जिंकला-ही गोष्ट कदाचित कोणतीच मुलगी मान्य करणार नाही, पण प्रत्येक पुरुषाने हीच गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी. मुली या तर्कापेक्षा भावनेला जास्त महत्व देतात. त्यांच्यातल्या भावनेला तुम्ही कशी फुंकर घालू शकता हे महत्वाचे . फ्लर्टींग पुरुषाचा जन्मसिध्द अधिकार आहे, पुरुषाने फ्लर्ट करावे अशी प्रत्येकच स्त्री ची इच्छा असते.
पुर्वी पण लिहिलंय कधीतरी.. की लठ्ठपणाच्या बाबतीत आणि केसांच्या बाबतीत प्रत्येकच मुलगी अतिशय संवेदनशील असते. तेंव्हा कितीही रोड असली तरीही , तिला आपण लठ्ठंच आहोत असे वाटत असते.थोडे सांभाळून आणि नाजूकपणे हा विषय हाताळा. फ्लर्टींग करतांना, हॉटेल मधे खाताना शक्यतो या विषयावर बोलणे टाळले पाहिजे. नाही तर एखादा पिज्जा वगैरे मागवून डायटींगच्या गप्पा मारणॆ म्हणजे.. .. ती दूर गेलीच समजा तुमच्या पासून. तिला जर तुम्ही तुमच्या बोलण्याने खुलवू शकणार नसाल तर तिच्याबरोबर फ्लर्टींग विसराच!!
मादीला नराबद्दल आकर्षण आहे की नाही हे समजणं पक्षांच्या बाबतीत खूप सोपं असतं . मोर पण जेंव्हा लांडोरीसमोर पिसारा पसरवून नाच करतो तेंव्हा तो तिच्याकडे पुर्ण पणे दुर्लक्ष करतो- पण त्याला बरोबर समजतं की ती त्याच्याकडे आकर्षित होतेय ते. पण पुरुषांना हे समजायला कित्येक दिवस जाऊ द्यावे लागतात. कधी तर वर्षानुवर्ष समजत नाही !!
स्त्रियांना एक सहावं इंद्रिय असतं. कुणी त्यांच्या कडे तसे पहायला लागले की त्यांच्या लगेच लक्षात येते. एखाद्या मुलीकडे पाहाताय, आणि तिला ताबडतोब तशी जाणीव होत असते. तिचा तुम्हाला पकडण्याचा प्रयत्न सुरु होतो. मग ह्या खेळामधे एखाद्या वेळेस नजरेला नजर मिळाली तर अपराधीपणाची भावना येऊ देता कामा नये. ही सुरुवात समजायची- फ्लर्टींग बद्दल अजून तर बरंच काही लिहिलं जाउ शकतं पण … कितीही लिहिलं तरीही ते कमीच आहे. फ्लर्टींग ही एक सामाजिक गरज आहे. आता सामाजिक गरज हे लिहिलेलं काही लोकांना पटणार नाही. पण माझ्या ब्लॉग वर एक लेख लिहीलाय खूप दिवसा पुर्वी- ’स्त्री पुरुष इंट्रेस्टींग सर्व्हे’ म्हणून. एका प्रथितयश वृत्तपत्राने एक सर्वे केला होता. त्याचे जे निष्कर्ष मिळाले, ते खूपच मजेशीर होते.
पुर्वी लिहिलं होतं ब्लॉग वर इथेच..
पूर्वप्रसिध्दी:- ऋतू हिरवा

Monday, 14 May 2012

Sunday, 13 May 2012

बंदी घातलेली पुस्तकं..

कुठलीही गोष्ट आपण नेहेमीच एका ठरावीक बौद्धिक तराजू मधे तोलत असतो. आपल्या मतांमधे म्हणूनच मते – मतांतरे होतात. एखादी गोष्ट जेंव्हा त्यावर बंदी आणली जाते तेंव्हा जास्त लोकप्रिय होते.जशी गुजरात मधे दारु..तशीच बऱ्याच  बंदी घातलेल्या पुस्तकांबद्दल   वाचण्यात आलं होतं. त्यामुळे ही पुस्तकं वाचायची  इच्छा वाढली होती. थोडी राजकीय , पण बरीचशी श्रृंगारिक पुस्तकं होती बंदी घातलेल्या पुस्तकांमधे .  लेखकांवर अशी पुस्तकं लिहिल्या बद्दल   खटले  चालवून   लेखकांना अटक पण करण्यात आली होती-  आता, इतकी गाजलेली पुस्तकं, मग त्यामधे काय असेल ही उत्सुकता  काही शांत बसू देत नव्हती- ती पुस्तकं एकदा तरी वाचलीच पाहिजे अशी इच्छा व्हायची .
नेटवर बहुतेक सगळी पुस्तकं पिडीएफ मधे उपलब्ध आहेत- .बंदी घातली गेलेली  पुस्तकं नेट वर शोधली आणि डाउन लोड करुन वाचली- काही पुर्ण वाचली , तर काही नुसती चाळली त्यांचीच थोडी माहिती इथे देतोय. यातली काही पुस्तकं ही अश्लीलतेकडे झुकणारी, किंवा अश्लील म्हणता येतील अशी पण आहेत. पुस्तकांचा काळ हा अगदी १७ व्या शतका पासून तर १९ व्या शतका पर्यंत   आहे. त्या काळी पण असं साहित्य अस्तित्वात होतं हे बघून खरं तर आश्चर्यच वाटतं.
एखाद्या गोष्टीकडे पहाण्याचा काही दशका  पूर्वीचा दृष्टीकोन आणि आजचा दृष्टीकोन यामधे जमीन अस्मान चं अंतर आहे. मी लहान असतांना चंद्रकांत काकोडकर हे अश्लील – चावट लिहिणारे म्हणून प्रसिद्ध होते.ह्यांची शामा ही कादंबरी बरीच गाजली होती. त्या  कादंबरी मधे काय होतं असं?? आजच्या तुलनेत अजिबात काही नव्हतं. थोडं रोमान्सचं वर्णन केलं गेलं होतं. त्या काळात या कादंबरी कडे एक श्रृंगारिक कादंबरी म्हणून बघितलं जायचं आणि आमच्या सारखे मुलं चोरुन वाचायचे . तेंव्हा नुस्तं नायकाने नायिकेला जवळ घेतलं, आणि तिचं चुंबन घेतलं, इतकं जरी वाचलं तरी  अंगावर शहारुन यायचं   :)   सगळ्यात जास्त इरॉटीक /रोमॅंटीक साहित्य होतं मराठी मधलं. आता नेटवर इतकं जास्त व्हिडिओ आणि अश्लील फोटो, लेख उपलब्ध आहेत, की काकोडकर एकदम फिके वाटतात, आणि त्यांच्यावर का केस केली गेली होती हेच समजत नाही??
काही महिन्यांपूर्वी एक रा.घो. कर्वेंवरचा चित्रपट पाहिला होता टिव्हीवर. त्या मधे दाखवलं आहे, की समाज स्वास्थ्य म्हणून जे मासिक ते काढायचे त्याला पण एक अश्लील साहित्य म्हणून त्यावर खटले भरण्यात आले होते.मराठी साहित्य इतके शुचिर्भूत होते, की सीमा रेषेला कधी  किंचितही स्पर्श झाला तरी लोकं अकांड तांडव करायचे. हा चित्रपट अतिशय सुंदर होता. संतती नियमां साठी त्यांनी केलेलं काम उत्कृष्ट रीत्या दाखवलं होतं. पदरचे पैसे खर्च करुन ते एक समाजस्वास्थ्य म्हणून  मासिक चालवायचे. अश्लिलतेच्या कायद्याखाली त्यांच्यावर बरेचदा खटले दाखल करण्यात आले . पैसा नसतांना पण त्यांनी हे मासिक सुरु ठेवलं.
केवळ भारतामधे नाही तर जगभरात असे अनेक साहित्य प्रकाशित केले गेले आणि त्या साहित्यिकांवर खटले पण चालवले गेले. काही ठिकाणी तर जेल मधे पण जावं लागलं साहित्यिकांना.
लेडी चॅटर्लीज लव्हर हे पुस्तक एवढ्यातच म्हणजे १९६० सालपर्यंत बंदी घातलेलं पुस्तक होतं . या पुस्तकावर १८५७ चा ऑब्सिन पब्लिकेशन ऍक्ट खाली खटला भरण्यात आला होता. या पुस्तका मधे होतं तरी काय?? मी वाचलंय.. अजिबात काहीही आक्षेपार्ह वाटलं नाही मला.प्लॅटोनिक लव्ह वगैरे काही नसतं.प्रेम हे शेवटी   शारिरीक पातळीवरच जाउन पोहोचतं असं लिहिलंय यामधे-.
हे पुस्तक मला तरी अतिशय उत्कटतेने लिहिलेली एका स्त्रीची अतृप्त भावनांची कहाणी वाटली. कॉनी चा नवरा लॉर्ड क्लिफोर्ड… एका युध्दामधे जातो- तो जातो तेंव्हा होणारा सेक्स्युअल भावनांचा कोंडमारा आणि ती वाट पहात असते तो परत येण्याची. तो जेंव्हा परत येतो तेंव्हा व्हिल चेअर वरच बसलेला!!  अजिबात  खालच्या शरीराची हालचाल करता येत नसते त्याला.
कॉनीच्या स्त्रीसुलभ आणि सेक्स्युअल  भावना  या सारख्या उफाळून येतात- त्यांची पूर्ती तर व्हायलाच हवी. नवऱ्यावर असलेलं प्रेम, त्याची  ’ती’ असमर्थता, त्यातुन आलेलं वैफल्य आणि त्या मुळे  उद्युक्त होणाऱ्या सेक्स्युअल  भावनांची  दमन करण्याचा प्रयत्न आणि नंतर मग   पूर्ती करण्यासाठी तिने तिच्या नवऱ्याच्या मॅनेजर बरोबर केलेली शय्या सोबत -अशी सरळ धोपट कहाणी आहे.  कॉनी ही व्याभीचारी नाही- तिचं आपल्या नवऱ्यावर प्रेम आहे अगदी मनापासून.. पण , परिस्थिती मुळे  ती  केवळ शरीरसूखा साठी  नवऱ्याच्या मॅने्जर बरोबर  लग्न बाह्य संबंध ठेवते.
जर तिचा नवरा व्हिल चेअर बाउंड झाला नसता, तर ती अशी वागली असती कां?? हा विचार बरेचदा वाचतांना मनात येतो..बऱ्याच लहान लहान प्रसंगातून अतिशय सुंदर रीतीने  तिचा मॅनेजर बरोबरचा रोमान्स रंगवला आहे.  डि एच लॉरेन्स यांचं हे पुस्तक लिहिलेलं हे पुस्तक एकदा तरी अवश्य वाचायलाच हवं .पुस्तकाची भाषा अप्रतिम आहे  डीएच लॉरेन्सचं पुस्तक  असल्यामुळे !! आता हे पुस्तक म्हणजे श्रृंगारिक कादंबरीतला एक मानदंड ठरावा असे आहे . या पुस्तकातल्या नायिकेचा तिरस्कार करावा की तीची कीव करावी – ह्या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधताच हे पुस्तक संपत. एकदा आवर्जून वाचा..
इथे लिंक दिलेली आहे डाउन लोड करायला.
स्त्री पुरुष संबंधाची उघडपणे  केली गेलेली वर्णने आपल्या देशात अगदी फार पुरातन काळापासून चालत आली आहेत. वात्सायनाचे कामसुत्र म्हंटलं की  फक्त ती ऍक्रोबॅटीक आसनंच आठवतात. पण खरंच तसं आहे का? कामसुत्रा मधे त्या व्यतिरिक्त खुप माहिती दिलेली आहे. आपण फक्त ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेऊन आपली मतं बनवतो- काम सुत्र म्हणजे ती चौर्यांशी आसनं इतकंच समजतो आपण पण तसं नाही. हे पुस्तक अतिशय सुंदर रितीने त्या काळातल्या वातावरणामधून वैवाहीक जिवन सुखी कसं असावं याची माहिती देणारं पुस्तक होतं.  ह्या पुस्तकामध्ये आदर्श वैवाहीक जीवन कसं असावं याची माहिती दिलेली आहे .स्त्री ला काय आवडतं? पुरुषाने कसे वागावे? असे अनेक मुद्दे आहेत दिलेले. दुर्दैवाने आजही इतक्या सुंदर ग्रंथाकडे भारतामधे एक पोर्नोग्राफिक पुस्तक म्हणून पाहिलं जातं.इथे वाचा ते पुस्तक.
हे पुस्तक खरं तर या विषयावरचं सगळ्यात महत्वाचं पुस्तक ठरु शकतं . याच पुस्तकावरून बेतलेलं एक अरबी पुस्तक पण त्या काळी निघालं होतं त्याचं नाव होतं पर्फ्युम्ड गार्डन.वाचायचं असेल तर इथे आहे ते.. यावर जास्त काही लिहित नाही फक्त एकच आहे हे पुस्तक म्हणजे परस्त्रीला प्रेमात कसे पाडायचे याचे पाठ पढवतं.नवऱ्याच्या नकळत एखाद्या स्त्रीला प्रेमात कसं पाडायचं?? ( या अरबांची स्टाइल तेंव्हा पण तशीच होती. )मला वाटतं की पुस्तका पेक्षा फॅंटसी कडे वळणारे लेखन होते हे. १८५० च्या काळात अशी पुस्तकं छापण  म्हणजे ्खूपच धैर्याचं काम होतं. ही पु्स्तकं कामोत्तेजक   जरी नसलं, तरीही नैतीक मुल्यांना धक्का देणारं म्हणून हे पर्फ्युम्ड गार्डन तेंव्हा खुप गाजलं होतं. अशाच लेखनामुळे नैतीक अधःपतन होतं अशी कल्पना पण काही लॉर्डस लोकांनी हाउस ऑफ कॉमन्स मधे मांडून त्यावर बंदीची मागणी केली.पुढली बरीच वर्ष यावर बंदी घातली गेली होती .
सगळ्यात जास्त गाजलेलं पहिलं सेक्स बद्दल स्पष्ट पणे लिहिल्या गेलेलं एका वेश्येचं आत्मचरित्र म्हणजेच फॅनी हिल्स वुमन ऑफ प्लेझर!! १७४८ साली ही कादंबरी लिहिली गेली. जॉन क्विलंड हा लेखक होता या कादंबरीचा. अतिशय  धीट विषय, उत्कृष्ट हाताळणी, आणि भावना चेतवणारं लिखाण म्हणून या कादंबरीचा उल्लेख करावा लागेल. फॅनी हिल्स म्हणजे आजकालची कहाणी फक्त लिहिल्या गेली १७४८ मधे.
एका गावाकडल्या मुलीला शहरात आणून कुंटणखान्यात आणून ठेवलं जातं. तिथे ती दररोजच  स्त्री पुरुष संबंध पहाते ,आणि नकळत त्या बद्दल एक वेगळं आकर्षण निर्माण होतं तिच्या मनात.पुरुषाची भिती संपून जाते .एकदा भिती संपली की तिला असे संबंध हवे हवेसे वाटु लागतात.    अगदी जो कोणी पहिला पुरुष येइल त्याबरोबर किंवा कोणाही बरोबर शैय्या सोबत करायची मानसिक तयारी होते तिचे.. नंतर तिचं चार्ल्स वर प्रेम बसून त्याच्या  बरोबर पळून जाणं, चार्ल्सच्या वडिलांनी त्याला परदेशी पाठवून देणं.. आणि मग फॅनीचं केवळ स्वतःच्या सेक्स्युल निड्स पुर्ण करुन घेण्यासाठी  फुल फ्लेज्ड प्रॉस्टीट्य़ुशन -सुरु करणं आणि येन केन प्रकारेण …. जाउ द्या. .. पुस्तक वाचायचं असेल तर.. इथे आहे ते!  असं म्हणतात की त्या काळी स्त्रियांना लैगीक भावना फार दाखवणं अपेक्षित नव्हतं, कद्चित म्हणून एक स्त्री आपल्याला सेक्स आवडतो, आणि तो पुर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या पुरुषांशी शैय्या सोबत करते.. ही गोष्टच सर्व मान्य नव्हती.  म्ह्णूनही असेल हे पुस्तक गाजलेलं.  इतकी वर्ष बंदी असलेलं पुस्तक म्हणुन एकदा तरी वाचावं म्हणून मी डाउन लोड केलं पण पुर्ण वाचलं नाही.. अर्धवट वाचून सोडून दिलं.
दसऱ्या महायुध्दाच्या काळात , कोणी वॉल्टर हे काल्पनीक  नांव घेउन  एक माणुस  आपला निरनिराळ्या  १००० स्त्रियांबरोबरच्या सेक्स्युअल संबंधाची कहाणी   लिहितो. माय सिक्रेट लाइफ या अतिशय पॉप्युलर पुस्तका मधे- आणि  ते पण ११ खंडामध .इस १८५७ च्या कालावधीमधे असे स्पष्ट लिहिले गेलेले हे एकुलते एक   अश्लील पुस्तक म्हणावे लागेल.  खुप पॉप्युलर पुस्तक होतं ते.हलकं फुलकं, किंचित तोचतोपणा असलेलं हे पुस्तक आहे..  अर्थात तुम्ही जर आजच्या अव्हेलेबल असलेल्या साहित्याबद्दल बोलाल, तर हे पुस्तक एकदम मिळमिळीत वाटण्याची शक्यता आहे पण १८५७ च्या काळात ह्या पुस्तकामुळे किती वादळ उठलं असेल ते तुम्ही समजू शकता.  हा वॉल्टर कोण होता ते कधिच समजलं नाही.या पुस्तकावर बऱ्याच देशात आणि खूप वर्ष बंदी होती.   (ऑब्सिन ऍक्ट च्या अंतर्गत बंदी ). ते पुस्तक इथे आहे. आजकालच्या अश्लिलतेच्या मानदंडापुढे हे पुस्तक एकदम फूसकं वाटू शकतं- आणि कंटाळवाणं तसेच रिपिटेटिव्ह नेचरच.
एक पुस्तक होतं. १२० डेज ऑफ सोडोम. सेक्स फॅंटसी वर वाहिलेलं हे पुस्तक अतिशय बिभत्स म्हणता येइल असं पुस्तकात होतं. मार्किस नावाच्या फ्रेंच लेखकाने लिहिलेलं हे पुस्तक सॅडिझम वर लिहिलं होतं. हे पुस्तक वाचलं की  किळस वाटते वाचतांना. यावरच एक चित्रपट पण काढला गेला होता- याच नावाने. याची लिंक मला सापडली पण मुद्दामच इथे देत नाही. १७व्या शतकात फ्रान्स मधे एका निर्जन भागातल्या पॅलेसमधे सरदार लोकं खून, वासना, बिभत्सता वागणूक, यांचा जो खेळ खेळतात त्याचं वर्णन आहे या पुस्तकामधे. १६ कुमारीका, ८ तरुण, आणि काही स्त्रियांना एका ठिकाणी डांबून ठेवले जाते. हे सरदार चार वेश्यांकडुन त्यांचे अनुभव ऐकतात आणि त्यांची उजळणी या तरुणींवर केली जाते.या मधे छळाची वर्णनं आहेत केलेली की वाचतांना घृणा यावी. मी तर हे पुस्तक वाचूच शकलो नाही.शेवटी प्रत्येकाचाच खून केला जातो. यु ट्युब वर काही क्लिप्स आहेत या चित्रपटाच्या. शोधा, हव्या असतील तर- मी देणार नाही लिंक्स किंवा पुस्तकाची पिडीएफ लोकेशन..
हेन्री मिलर नावाचा एक लेखक होऊन गेला. त्याने १९४० मधे एक ट्रॉपिक ऑफ कन्सर ही कादंबरी लि्हीली.अमेरिकेत ऑल टाइम फर्स्ट ५० बेस्ट नॉव्हेल्स मधे पण हिचा समावेश केला गेला आहे.
याच सुमारास  डेल्टा ऑफ व्हिनस हा कथा संग्रह पण प्रकाशित करण्यात आला- लेखिका होती अनेस निन -मिलरची प्रेयसी!!!!. असं म्हणतात की प्रत्येक पान  लिहीण्यासाठी लेखकाला त्या काळी एक डॉलर देण्यात आला होता. अट एकच होती, कादंबरी मधे इतर वर्णन, ्निसर्ग वगैरे अजिबात नसावे , फक्त सेक्स आणि सेक्स यावरच ही कादंबरी असावी. १९६७ मधे पेंग्विनने प्रकाशित केलेली हा कथा संग्रह मजेशिर आहे.  या कथा संग्रहामुळे उत्तेजक लेखन करणारी पहिली लेखिका म्हणून तिला मान मिळाला.
त्या काळात जेंव्हा आपल्या भारता मधे आपण राघो कर्वेंवर खटला चालवत होतो, त्याच काळात जगात इतकं काही  होऊन गेलं होतं. काही बाबतीत मागासलेलं असणं  पण खूपच चांगलं असतं नाही??

गमतीशीर म्हणी..

परवा सुहासचा एक बझ पाहिला, त्यामधे त्याने काही चांगल्या म्हणी असतील तर सांगा म्हंटलं होतं.तो बझ पाहिला आणि काही जुन्या म्हणी आठवल्या.त्यातलीच एक म्हण तिथे लिहिली. ती म्हण आमच्या लहानपणी एक बाई भांडी घासायला यायची  तिच्या वापरा मधे होती. ही म्हण आणि अनेक  अशा अनेक म्हणींचा खजिना असायचा तिच्या पोतडीत.
माझी आज्जी माझे खूप लाड आणि कौतूक करायची. मी काहीही केले तरी आईच्या मारा पासून वाचवायची. तेंव्हा ती भांडेवाली बाई ” लाडका लेक मंदिरी हागे, ढुंगण धुवायला महादेव मागे” अशी अस्सल इरसाल म्हण वापरायची. त्या तशा प्रसंगाला अगदी चपखल बसणारी. तेंव्हा मात्र त्या मावशीचा खूप राग यायचा- पण आज मात्र तिच्या कल्पनाशक्तीची कमाल वाटते. श्लील- अश्लिलतेच्या मर्यादा ओळखून केलेल्या ह्या जुन्या म्हणी म्हणजे एक अमुल्य ठेवाच  आहे.
हा सगळा आपला पूर्वापार चालत आलेला भाषेचा ठेवा आता नामशेष होत चाललाय. बरेचदा तर शब्द चार चौघात बोलण्यासारखे नाहीत, म्हणून टाळल्या जातात. आपण साध्या साध्या वापरातल्या शब्दांकडे पण वाईट म्हणून बघतो.
बऱ्याचशा जुन्या गावाकडल्या  म्हणींच्या मधे काही म्हणी मधे तर बरेच श्लील -अश्लीलतेच्या मर्यादा रेषेवरचे  शब्द पण सर्रास वापरले गेलेले दिसतात. स्पष्टच बोलायचं तर  असभ्य समजले जाणारे, किंवा घाण समजले जाणारे शब्द विपुल प्रमाणात वापरले जातात . काही म्हणी तर पुर्ण म्हटल्या पण जात नाहीत, तर केवळ पहिला किंवा दुसरा अर्धा भागच वापरला जातो.अर्थात त्यात काही वावगं आहे असे नाही, पण पुर्ण म्हणी पण मजेशीर असतात. जसे नावडतीचे मीठ अळणी, हा अर्धा भाग नेहेमीच वापरला जातो, पण पुढचा अर्धा भाग आहे तो मात्र कधीच वापरला जात नाही. पुर्ण म्हण अशी आहे,  “नावडतीचे मीठ अळणी, आवडतीचा शेंबुड गोड”
तशीच ही पण एक म्हण बघा” नाचता ये‌इना अंगण वाकडं, स्वयंपाक येईना ओली लाकडं” या म्हणीतील पण फक्त पहिला अर्धा भाग वापरला जातो. तसेच ’येथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे काम नव्हे” ही म्हण पण त्याच प्रकारातली. नेहेमी अर्धवटच वापरली जाते त्यामुळे दुसरा भाग माहितीच नसतो.
म्हणी आणि  हे बऱ्याच वर्षा पुर्वी पासून चालत आलेले आहेत. एक पान भर एक्स्प्लेनेशन देउन जे होत नाही ते एका म्हणी मुळे होते. एक लहानशी म्हण बरंच काही न बोलता पण बोलून जाते.  भाषेचे सौंदर्य आहे म्हणी, अलंकारामध्ये असते. माझ्यासारख्या लोकांना जरी ते लिहिता येत नसलं तरीही वाचायला मात्र नक्कीच आवडतं.  . बहुतेक म्हणी या बोली भाषेत वर्षानुवर्ष ( कदाचित शेकडॊ वर्षापासून)  चालत आल्या आहेत.त्यातल्याच काही इथे लिहितोय.
उगाच काहीतरी कारण सांगायचं, म्हणजे वड्याचं तेल वांग्याला लावायचं असं कोणी केलं की त्या साठी ’ “पादऱ्याला  पावट्याचा आधार ” अशी म्हण वापरली जायची.  ही एक जुनी म्हण आहे  किती अर्थ पुर्ण आहे बघा, अजिबात काही सांगायची गरज नाही- ” अवघड जागचं दुखणं, आणि जावई डॉक्टर “. एका वाक्यात कितीतरी सांगून टाकलं – इतकं की अजून एक्प्लेनेशन द्यायची गरजच नाही.
एक म्हण आहे, ” कौतुकाची वरात, अन हागायला परात” या अशा खास  म्हणी पूर्वीच्या काळी नेहमीच्याच वापरात होत्या. एखाद्याचं कौतूक करायचं तर किती कराव?  बरेचदा एखाद्या माणसाला दुसऱ्याचे इतकी जास्त वर वर करण्याची सवय असते की दुसऱ्या पाहणाऱ्याला ती ’चमचेगीरी’ करतोय अशी वाटते. लहानशा म्हणी नुसार सगळी परिस्थिती कशी स्पष्ट होते पहा.
तशीच ही एक म्हण पहा, ” कावळा गेला उडून, गू खा चाटून”. पुर्वी वाळण टाकलं की कावळे उडवायला तिथे कोणाला तरी बसावं लागायचं. समजा एखाद्या वेळेस काही कामा निमित्त त्या व्यक्तीला उठून जावं लागलं आणि तेवढ्यात जर कावळे सगळं वाळण घेउन उडून गेले तर काहीच शिल्लक रहात नाही. हा झाला शब्द्शः अर्थ, आता व्यावहारिक अर्थ काय आहे ते सांगायची गरज वाटत नाही. इंग्रजी मधे एक म्हण आहे बोन्स  फॉर लेट कमर्स !
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून परवाच्या भाषणात एक म्हण वापरली होती, “शेण आपण खायचं, आणि तोंड दुसऱ्याचं हुंगायच” . अर्थात अशा म्हणी वापरल्या की सरळ टाळ्या पडणारच भाषणात! तसंही एक आहे दोन्ही ठाकरे बंधू अगदी खास शेलक्या म्हणी शोधून वापरतात त्यांच्या भाषणांमधून – हा वारसाहक्काने मिळालेला ठेवा आहे त्यांना बहूतेक!
बरं सगळ्याच म्हणी काही अशा वाईट शब्दांच्या ( त्यांना वाईट कशाला म्हणायचं? साधे सोपे सामान्य शब्द आहेत ते)  असतात असेही नाही तर कधी कधी अगदी साधे शब्द वापरले  तरीही  सामाजिक जिवनाचे वास्तव म्हणून ” काळी बेंद्री  एकाची, सुंदर बायको लोकांची” अशी म्हण पण वाचायला मिळते.
एक म्हण  एका मायबोलीकराने वापरली होती ती मायबोलीवर वाचली होती ” नको तिथे बोटं घालू नये, आणि घातली तर वास घेत बसू नये” हसून हसून पुरेवाट झाली होती वाचल्यावर. एका लहानशा म्हणीमधे किती मोठा आशय आहे नाही?
“घरची म्हणते देवा देवा, बाहेरचीला चोळी शिवा” ही म्हण किंवा घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणे ह्या दोन्ही म्हणी जवळपास एकाच अर्थाच्या पण एका म्हणीच्या ठिकाणी दुसरी वापरलेली चालत नाही. योग्य त्या वेळी योग्य ती म्हण वापरणे या मधेच खरी कला आहे.
बरेचदा अशक्य गोष्टींची अपेक्षा केली जाते. कितीही महत्वाचे काम असले म्हणून काय झाले?  नाही होणार सांगायची ही एक पद्धत पहा, तुम्ही कितीही सांगाल हो, काम झालंच पाहिजे म्हणून, पण “जावई पाहुणा म्हणून आला, तर रेडा दूध देईल काय?”
काही लोकं  जे अगदी ऑफिसमधे साहेब लोकांची चमचेगिरी करतात त्यांच्या साठी एक म्हण आहे, ’ साहेबाने रेड्याचे दुध काढ म्हंटले, तर तो चरवी ( भांडं) कुठे आहे म्हणून विचारतो’ . ही म्हण तर  मी पण बरेचदा वापरतो.
एखाद्या मोठ्या माणसाचा लहानसा सेवक पण खूप मान मरातब मिळवतो. उदाहरणार्थ, जसे आमिरखानचा ड्रायव्हर पण आमिरखानचा पर्सनल अ‍ॅडव्हायझर असल्यासारखा वागत असतो. अशाच प्रकारच्या प्रसंगांसाठी ” थोराघरचे श्वान,त्याला देती सर्व मान” ही म्हण अगदी पर्फेक्ट बसते.(आमिरखान नाव फक्त काहीतरी वापरायचं म्हणून वापरलंय.)
खूप खूप लक्ष द्यायचं, पण …. जाऊ द्या, एक म्हण , जी स्वतःच सगळं स्पष्ट करते – ” दिंडी दरवाजा उघडा ठेवायचा, अन मोरीला बोळा घालायचा” मला ही म्हण पण खूप आवडते. ’ताका पुरते रामायण’ किंवा साधारण तशीच “नागोबा  म्हसोबा पैशाला दोन, पंचमी झाली की पुजतय कोण?” या एकाच अर्थाच्या म्हणी आहेत.एक नेहेमीच्या वापरातील, आणि एक विस्मृतीत गेलेली.
नवरा बायको, जावई सासरचे लोकं, सासू सून , या सगळ्या नात्यांचे वेगवेगळे पदर उघडले जातात या म्हणींच्या मधून.  अशा अनेक म्हणी आपल्या मराठी मधे आहेत.   ही एक गमतीशीर म्हण बघा ” भोळी ग बाई भोळी, लुगड्यावर मागते चोळी, खायला पुरणपोळी” किंवा ही “मी नाही त्यातली कडी लावा आतली”अशा द्वैअर्थी म्हणी पण आहेत बर्याच आहेत. या सारख्या अनेक म्हणी आहेत. पण  सगळ्यांच्या बद्दल लिहित बसलो तर एक ग्रंथच होईल, म्हणून थांबतो इथे.
थोडं शोधलं , तर नेट वर एक
सुंदर साईट दिसली म्हणीं साठी खास वाहिलेली. त्या साईटवर अशा ९०० च्या वर म्हणी आहेत.अवश्य भेट द्या.